सिल्लोड, (प्रतिनिधी): सिल्लोड शहरातील एकता रिक्षा युनियनच्या टॅक्सी रिक्षा पॉईंटच्या नामफलकाचे उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील प्रियदर्शनी चौकात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित रिक्षाचालकांशी संवाद साधून त्यांच्या विविध अडचणी, समस्या तसेच रिक्षा व्यवसायाशी संबंधित विषयांवर चर्चा केली.
रिक्षा व्यवसाय हा शहरातील अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार आहे. बदलत्या काळानुसार रिक्षाचालकांनी पारंपरिक रिक्षांसोबतच ई- रिक्षेचा पर्याय स्वीकारावा, असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले. ई रिक्षा खरेदीसाठी बँकांकडून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे रिक्षाचालकांनी या सुविधेचा लाभघेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असे त्यांनी सांगितले.
ई-रिक्षेमुळे रिक्षा व्यवसायाला आधुनिक स्वरूप मिळण्यास मदत होण्यासोबतच भविष्यातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीनेही हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो, असे आमदार सत्तार यांनी स्पष्ट केले. तसेच प्रवाशांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह सेवा देत सिल्लोड शहरातील वाहतूक व्यवस्थेत रिक्षाचालकांनी सकारात्मक भूमिका बजावावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. मनोज राठोड, नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन पा. गाढे, नगरसेवक नंदकिशोर सहारे, अकील वसईकर, शेख बाबू, जुम्मा खा पठाण, शेख इमरान उर्फ गुड्डू, चांद मिर्झा तसेच टॅक्सी युनियनचे अध्यक्ष अक्रम कोतवाल, सचिव शेख बब्बू, उपाध्यक्ष सुनील लांडगे, कोषाध्यक्ष शमशेर कोतवाल यांच्यासह शेख पटेल, अक्रम पठाण, शेख भिकन, लूकमान सय्यद, नाजिम पठाण, फारुख शेख, इसाक पठाण, मुक्तार पठाण, सुनील शेंडे, शफिक सय्यद, शमशेर पठाण, आलेर पठाण, गौतम हिवराळे, हसन शेख आदी रिक्षाचालक व पदाधिकारी उपस्थित होते.













